ट्रम्प यांचे वक्तव्य: 'इराणसोबतचा करार अंतिम नाही,' पुन्हा 'बॉम्ब टाकण्या'चा दिला इशारा

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, "इराणसोबत ज्या करारावर सहमती झाली आहे तो अद्याप अंतिम झालेला नाही."
जी-7 शिखर परिषदेत इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांच्यासोबत उभे असताना ट्रम्प म्हणाले, "जर ते (इराण) योग्य वर्तन करत नसतील, तर आम्ही बरोबर त्यांच्या डोक्यावर बॉम्ब टाकायला सुरुवात करू."
अमेरिका इराणमध्ये गुंतवणूक करत नसल्याचंही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. इराण अंतिम तोडग्यासाठी तयार झाल्यास त्याला गुंतवणूक निधी उभारण्याची परवानगी देण्यास अमेरिका तयार असल्याच्या वृत्तांनंतर ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया आली.
मंगळवारीही ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, या करारानुसार "इराणकडे कधीही अण्वस्त्र असणार नाही."
अमेरिका आणि इराण यांच्यात शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं हे वक्तव्य आलं आहे.
मात्र, या कराराचा तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने रविवारी (14 जून) या करारावर सहमती झाली होती. याला 'सामंजस्य करार' असं म्हटलं जात आहे. मात्र, या करारात नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे, हे अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
'करार अद्याप अंतिम नाही'
सोमवारी (15 जून) राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, "या करारावर पूर्णपणे स्वाक्षऱ्या झाल्या आहेत" आणि त्याचा संपूर्ण मजकूर "लवकरच" प्रसिद्ध केला जाईल.
या करारामुळे युद्धविरामाची मुदत पुढील 60 दिवसांसाठी वाढवली जाईल. या काळात दोन्ही बाजू अंतिम कराराच्या तपशीलांवर चर्चा करतील.
ट्रम्प यांनी सांगितलं आहे की, या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा कोणतेही शुल्क न आकारता खुली करण्यात येईल आणि इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी संपुष्टात येईल.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं आहे की, इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भातील तांत्रिक चर्चा देखील या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
मात्र, हा शांतता करार नाही, असं बीबीसीचे आंतरराष्ट्रीय संपादक जेरेमी बोवेन सांगतात. "इराणचा अणुकार्यक्रम आणि निर्बंधांमधील सवलतींचं स्वरूप यांसारखे सर्वांत गुंतागुंतीचे मुद्दे भविष्यातील चर्चेसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत."
या कराराचा लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर नेमका काय परिणाम होईल, हा प्रश्नही कायम आहे. इराणचं म्हणणं आहे की, हा मुद्दाही कराराचा भाग असायला हवा.
अमेरिका आणि इराण शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये ब्युर्गेनस्टॉक रिसॉर्ट येथे या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























